बातम्या

शिर्डीतील गुरुपापौर्णिमा उत्सवासाठी 6 लाख प्रसाद लाडू; यंदा ४ लाखा भाविक येण्याचा अंदाज!

गुरुपौर्णिमा ३ जून रोजी आहे. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेसाठी दर्शनरांगेत मोफत चहा, कॉफी, पाणी देण्यात येणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यात यंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्टॉलमध्ये वाढ करण्यात आली. याशिवाय भाविकांसाठी भक्त निवासात लॉकरची सुविधाही यंदापासून सुरू करण्यात आली. साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार अाहे. साई मंदिर आणि परिसर विविध फुलांनी सजवण्यात येणार असून विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शिर्डीत वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी जड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात येणार असल्याने भाविकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागणार नाही. साई प्रसादालयही भाविकांसाठी सज्ज करण्यात आले. नाष्टा पाकिटे आणि लाडू प्रसाद, बुंदी प्रसाद पाकिटांचीही निर्मिती करण्यात आली.

कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी यंदा २ ते ४ जुलैदरम्यान देश-विदेशातून सुमारे ४ लाख भाविक शिर्डीत येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या एक दिवस अगोदर शनिवारी सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. इतर वेळी दररोज ५० ते ५५ हजार भाविक दर्शन घेतात. यंदा एक दिवस अगोदर यात १५ हजार भाविकांची वाढ झाली.

साई संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी उत्सव काळात सुकर दर्शनासह निवास, भोजन प्रसादाची व्यवस्था केली. मागील वर्षी गुरुपौर्णिमेसाठी शिर्डी येथे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले होते.

गतवर्षी गुरुपौर्णिमेला ५.१२ कोटींचे साईचरणी दान : गुरुपौर्णिमेला गतवर्षी २०२२ मध्ये शिर्डीत तीन दिवसांत तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. साईबाबांच्या मोफत भोजन प्रसादाचा १.५० लाख भाविकांनी लाभ घेतला होता, तर भक्त निवासांमध्ये व तात्पुरत्या व्यवस्थेचा २२ हजार भाविकांना लाभ झाला. खासगी लॉजेस व हॉटेलमध्ये ७० हजार भाविकांनी निवास केला होता. मागील गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या झोळीत ५ कोटी १२ लाखांची गुरुदक्षिणा दान जमा झाले होते.

प्रसादालयात दोन लाख भाविक प्रसाद घेतील : यंदा उत्सवासाठी चार लाख भाविक येतील, असा अंदाज गृहीत धरून प्रशासनाने नियोजन केले. पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी मंदिर परिसर व दर्शनरांगेत वॉटरप्रूफ मंडप, तात्पुरती निवास व्यवस्था, प्रसादालयात २ लाख भाविक तीन दिवसांत प्रसाद घेतील, अशी व्यवस्था करण्यात आली. विविध भक्त निवास आणि तात्पुरत्या मंडप व्यवस्थेतून २२ हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली.

लाडू प्रसाद विक्री केंद्र भक्त निवासांमध्ये : साई मंदिर लाडू प्रसाद विक्री केंद्रे मंदिर परिसराच्या बाहेर भक्त निवासांमध्ये सुरू करण्यात आली. त्यासाठी ६ लाख लाडू प्रसाद पाकिटांची निर्मिती करण्यात आली. दर्शनरांगेत भाविकांसाठी ३ लाख बुंदी प्रसाद पाकिटांची निर्मिती करण्यात आली. भाविकांच्या सुकर दर्शनासाठी संस्थानचे चार हजार कर्मचारी तैनात केले. निवास व्यवस्थेची माहिती भाविकांना उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वेस्टेशन, बसस्थानक, भक्त निवास येथे चौकशी केंद्रे तयार करण्यात आली. साई भजनसंध्या आणि कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले.

साईसेवक योजना गुरुपौर्णिमेपासून पूर्ववत सुरू : साईभक्तांच्या सेवेसाठी साईसेवक योजना कोरोनात बंद करण्यात आली होती. मात्र, अाता यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवापासून साईसेवक योजना ही पूर्ववत सुरू केली आहे.

साईभक्तांसाठी २४ बसेसची व्यवस्था
भाविकाना सुकर दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान याठिकाणी साईभक्तांना प्रसादालयात मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेण्यासाठी साई मंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भक्त निवासे आदी ठिकाणांहून २४ बसेस उत्सव काळात मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. – पी. शिवाशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान, शिर्डी.

गुरुपौर्णिमेनिमित्त साई प्रसादालयातील जेवणाचा मेनू
2 जुलै : मूगडाळ शिरा, हरभरा किंवा डांगर भाजी, बटाटा-वांगी भाजी, डाळ-भात, चपाती.
3 जुलै : जिलेबी, मटकी, वांगी-बटाटा किंवा कोबी-बटाटा किंवा डांगर भाजी, डाळ-भात, चपाती.
4 जुलै : बुंदी, वाटाणे, वांगी, डाळ-भात, चपाती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *